Saturday, August 9, 2025

Post

हृदयस्पर्शी प्रवास मांडणाऱ्या 'तू माझा किनारा' चित्रपटाच्या टायटल पोस्टरचे अनावरण नुकतंच प्रदर्शित झालेलं “तू माझा किनारा” या कौटुंबिक मराठी चित्रपटाचं शीर्षक पोस्टर प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे. निळसर आकाश आणि शांत समुद्राच्या पार्श्वभूमीवरचं हे शीर्षक हरवलेल्या भावनांना किनारा शोधून देणारं वाटतं. चित्रपटाचे दिग्दर्शन क्रिस्टस स्टीफन यांनी केले आहे. ते मुळचे मल्याळी भाषिक असले, तरी हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. महाराष्ट्राच्या मातीतील नात्यांना त्यांनी आपल्या संवेदनशील दृष्टीकोनातून पडद्यावर मांडलं आहे. दिग्दर्शक क्रिस्टस स्टीफन म्हणाले “'तू माझा किनारा’ ही वडील आणि मुलीच्या नात्याची हळवी, हृदयाला भिडणारी गोष्ट आहे. ही फक्त दोन व्यक्तींमधली नाही, तर प्रत्येक घरातल्या नात्यांची शांत, न बोललेली भावना आहे. पालकत्वातील प्रेम, समजून घेणं, आणि न बोलता दिला जाणारा आधार हे सगळं या चित्रपटात अत्यंत संवेदनशीलतेने उलगडलं आहे.” चित्रपटाची निर्मिती जोईसी पॉल जॉय यांनी केली आहे. ही एक अशा नात्याची गोष्ट आहे जी कितीही वेळा सांगितली गेली, तरी प्रत्येक वेळी ती नव्याने भिडते. छायाचित्रण, पार्श्वसंगीत आणि दृश्य संयोजन यांतूनही या नात्याचा हळुवारपणा अधिक गहिरा होत जातो. भावनांच्या लाटांवर अलगद तरंगत हा चित्रपट तुमच्या मनात खोलवर पोहोचणार, याची पहिली झलक या पोस्टरद्वारे अनुभवता येते. “तू माझा किनारा” लवकरच जवळच्या चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

No comments: